स्वरसागर संगीत महोत्सव
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यात, डीसेंबरच्या ऐन थंडीमध्ये पुणेकरांना पर्वणी मिळते, शास्त्रीय तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची. पुण्याच्या कडाक्याच्या थंडीतही श्रोतृवर्ग कानटोप्या आणि स्वेटर घालून जागेवरून न हलता या कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद घेत असतो.
अशाच एका आगळ्या वेगळ्या सोहळ्याची सुरुवात आज दि. २१.१२.२०१६ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिके तर्फे आयोजिण्यात आलेल्या ‘स्वरसागर’ संगीत महोत्सवाने झाली.
‘स्वरसागर’ या नावातच त्याची घनता आणि त्या गहनतेच्या सागरात घेऊन जाणारा सुरेल स्वरांचा नजराणा !
या महोत्सवाचे प्रमुख सल्लागार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांनी काम पहिले आहे.
या सोहळ्यात फक्त शास्त्रीयच नाही, तर प्रसिद्ध विभाग, त्यामध्ये सुगम संगीत, कवीकट्टा, शास्त्रीय नृत्य, गायन, वादन या सगळ्याचा समावेश करून हा सोहळा अधिकाधिक संपन्न करण्याचा प्रयास केला आहे.
आज पहिल्या दिवशीची सुरुवात झाली ग्वालेर घराण्याचे ज्येष्ठ गायक विकास कशाळकर यांचे शिष्य शरद मुरलीधर शिधये यांच्या सुरेल गायनाने झाली. ‘मुलतानी’ च्या ‘कोमल’ स्वरांनी त्यांनी वातावरणात एक उर्जा निर्माण केली. श्री. गजानन वाटवे यांच्याकडून सुगम संगीताचं शिक्षण चेतलेल्या शिधयेंनी ‘केदार’ रागातील ‘कान्हा रे नंदनंदन’ हि बंदीशही लडीवाळपणे सादर केली. त्यांना तबला- विवेक भालेराव, व्होयलीन- रवी शिधये, तानपुरा- चारुदत्त देशपांडे, भूपाली शिधये अशी साथसंगत लाभली.
पहिल्या दिवसाची सुरुवात अशा सुमधुर गायनाने झाली.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी कार्यक्रमाची उंची आणखीनच वाढवली संध्याकाळच्या रम्य संधीप्रकाशात ‘पुरियाधनाश्री’ चे सूर जणू वातावरणात एक आल्हाद निर्माण करत होते. ‘पायलीया झनकार’ या द्रुत बंदीशीने श्रोत्यांच्या मनामनात एक लयबद्ध झंकार निर्माण केला. आपले आजोबा वसंतराव देशपांडे यांचा वारसा पुढे चालवत आज शास्त्रीय संगीत तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम ते करत आहेत.
निखील फाटक – तबला, चैतन्य कुंटे – संवादिनी, ॠषीकेश पाटील आणि नारायण खिल्लारी – तानपुरा, अशा साथसंगतीमध्ये राहुल देशपांडे यांनी आपली कला सादर केली.
कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये ‘स्वरसागर’ तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मा. अजितदादा पवार उपस्थित होते.
पद्माकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार, मंजुषा पाटील यांच्या शिष्या अश्विनी बर्वे-तळेगावकर यांना प्रदान करण्यात आला. त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केलेली असून पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून संगीतात एम.ए. ही पदवी प्राप्त केली आहे.
स्वरसागर संगीत पुरस्कार यावेळी संगीत मार्तंड पंडित जसराज यांना प्रदान करण्यात आला. मेवाती घराण्याचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक ही त्यांची ख्याती आज जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत अजून काय लिहिणार !
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर पंडित जसराज यांच्या सुश्राव्य गायनाचा श्रोत्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. ‘पुरिया’ च्या ‘कोमल’ स्वरांमध्ये सारा आसमंत दरवळून गेला. तिन्ही सप्तकात स्वैरपणे संचार करण्याची पंडितजींची अदभुतशैली प्रत्येकवेळी दाद मिळवून जात होती.
पुरीयाच्या धीरगंभीर वातावरणावर हलक्या गुलाब जलाचा शिडकावा करावा तसा ‘बहार’ रागातील त्यांच्या द्रुत बंदीशीने बहार आणून केला. प्रेक्षकांची मनसोक्त दाद यामुळे पंडितजींनाही गाण्यात आनंद मिळताना दिसत होता. फक्त फुलांची नावं असलेला एक संस्कृत श्लोक गाऊन त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
भैरवी गाण्याचा श्रोत्यांच्या आग्रहाखातर पंडितजींनी ‘ओम् नमो भगवते वासुदेवाय’ ही भैरवी गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. शेवटच्या ‘विठ्ठलम्’च्या गजराने सारं वातावरण प्रसन्न झालं. याच भैरवीने पहिल्या दिवसाची सांगता झाली. पंडितजींना साथसंगत केली, तबला- केदार पंडित, संवादिनी- मुकुंद पेटकर, तानपुरा- अंकीता जोशी , सुरेश पत्की.
दिनांक २२/१२/२०१६ सायं. ५.०० च्या पुढे
संगीत अकादमी व संगीत वर्ग पिं.चिं.म.न.पा. – सायं. ४.३० ते ६.०० वा.
श्रद्धा मंडलेचा व स्वाती काशीकर – भरतनाट्याम – सायं. ६.०५ ते ६.२० वा.
पृथ्वीराज इंगळे – शास्त्रीय गायन – सायं. ६.२५ ते ६.४० वा.
निलाद्रीकुमार – सतार वादन – सायं. ६.४५ ते ८.३० वा.
गुंदेचा ब्रदर्स – शास्त्रीय गायन – रा. ८.३५ ते १०.०० वा.
For more details visit www.swarsagar.org
#SSMF2016
Follow us on Instagram, Twitter and Facebook for LIVE updates!